dailyvideo

.

किशोरींमध्ये रुजविणार आत्मविश्‍वास


 नागपूर - आत्मविश्‍वास माणसाला जगण्याची नवी उभारी देतो. वादळाशी झुंजण्याचे बळ त्यामुळे मिळते. आयुष्यातील नानाविध संकटांशी झुंजताना आत्मविश्‍वास उपयोगी ठरतो. हाच धागा पकडून ग्रामीण भागातील किशोर वयातील मुली ‘सक्षम’ झाल्या पाहिजेत म्हणून त्यांना आता दहा दिवसांत आत्मविश्‍वास कसा वाढवायचा याचा मंत्र शिकविला जाणार आहे.
    नागपूर, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, बीड, नांदेड, बुलढाणा, सातारा, कोल्हापूर, मुंबई, नाशिक या ११ जिल्ह्यांत केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे सबला योजनेच्या अनुषंगाने प्रशिक्षण वर्ग घेतले जातील, अशी माहिती महिला व बाल विकास विभागाच्या अधिकार्‍यांनी तभाशी बोलताना दिली.
    आरोग्य स्वच्छता, प्रजनन व लैंगिक आरोग्य, शरीराचा विकास, कुटुंब नियोजन व शस्त्रक्रिया, पोषण व आहार, पौष्टिक आहार शिजविण्याच्या पद्धती, पोषण आहाराचे प्रात्यक्षिक, लहान मुलांची काळजी, कुटुंब नियोजन व मुलांमध्ये अंतर ठेवण्याचे महत्त्व, स्तनपानाचे महत्त्व, जीवन कौशल्य, महिलांशी संबंधित कायदे, सामाजिक समस्या, लहान वयात लग्न, समाजात मुलींचे दुय्यम स्थान, लिंगभेद, लैंगिक शोषणापासून संरक्षण, आत्मविश्‍वास निर्मिती अशा महत्त्वाच्या विषयांचा त्या प्रशिक्षणात समावेश केला जाणार आहे. आत्मविश्‍वास हेच स्वसंरक्षणाचे साधन आहे. मागा म्हणजे मिळेल. ठोठवा म्हणजे उघडेल या तत्त्वाचा अनुभव घेण्याची प्रत्येकाने तयारी दाखवली पाहिजे. समृद्ध जीवनाची आकांक्षा असेल तर विचारांची आणि आत्मविश्‍वासाची कास तुम्ही धरली पाहिजे. अशा अनेक चांगल्या विचारांपासून ग्रामीण भागात राहणार्‍या किशोर वयातील मुली वंचित राहतात.
    त्यांच्या वाट्याला नेहमीच तुसडेपणा, अपमानास्पद वागणूकच येत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. किंबहुना त्याच चुकीच्या वागणुकीमुळे त्यांच्यात बुद्धिमत्ता आणि क्षमता असूनही तो आत्मविश्‍वास जागृत होत नाही. परिणामी त्या वेगवेगळ्या शोषणाला बळी पडतात. हा प्रकार न होता खरोखरच ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलीसुद्धा सक्षम झाल्याच पाहिजे म्हणून हा प्रशिक्षणाचा खटाटोप होणार आहे. एका प्रशिक्षण वर्गात ४० मुली राहतील असे अधिकार्‍यांनी तभाशी बोलताना स्पष्ट केले. याकरिता ‘दीपशिखा प्रशिक्षण मोड्युल’चा आधार राहणार आहे. एकंदरीत हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत नागपुरातील सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजीव पळसोदकर यांनी मांडले. ते म्हणाले, याची मांडणी विविध दृष्टिकोनातून करण्यात आलेली आहे. आत्मविश्‍वास निर्मिती ही निरंतर प्रक्रिया असली तरी दहा दिवसात बरेच लाभ आपण पदरात पाडून घेऊ शकतो.
    शेवटी, ‘सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे. सद्भावांच्या पर्जन्याने बहरून टाकू सारे. मानव-जीवन हे विकसूया. भय-चिंता सारी सोडूनिया. इतरा जगवू स्वत: जगू या॥ हे सावित्रीबाई फुले यांचे विचार शिरोधार्य मानत महाराष्ट्र शासनाने उचललेले पाऊल नक्कीच फलदायी ठरणार हे मात्र नक्की.

Posted by Admin on 3:11 AM. Filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for किशोरींमध्ये रुजविणार आत्मविश्‍वास

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery