dailyvideo

.

शांती टिग्गा ठरली लष्करातली पहिली रणरागिणी!

नवी दिल्ली, २ ऑक्टोबर
रणांगणावर शत्रूशी थेट टक्कर देण्याची कामगिरी भारतीय लष्करात आजवर केवळ पुरुषांवरच होती. शांती टिग्गा या ३५ वर्षीय महिलेने मात्र स्वकर्तृत्व आणि स्वबळाच्या जोरावर लष्करात जवान म्हणून प्रवेश केला असून लष्करातली ती पहिलीच रणरागिणी ठरणार आहे!
प्रांतिक सेनादलाच्या ९६९ रेल्वे अभियांत्रिकी तुकडीतून शांतीने लष्करात प्रवेश केला आहे. ज्येष्ठ सेनाधिकाऱ्याने सांगितले की, केवळ अधिकारी पदांवर तसेच थेट लढाईशी संबंध येणार नाही अशा पदांवर आजवर महिलांना लष्करात प्रवेश होता. पण शांतीने शारीरिक क्षमतांच्या सर्व कसोटय़ात सरस ठरून १३ लाख जवानांचा समावेश असलेल्या लष्करात पाय रोवला आहे. दोन मुलांची आई असलेल्या शांतीने धावण्याच्या शर्यतीत आपल्या पुरुष स्पर्धकांपेक्षा पाच सेकंद आधीच दीड किलोमीटरचे अंतर कापले! अवघ्या १२ सेकंदात तिने ५० मीटरचे अंतर धावून पार केले. हा एक विक्रमच आहे.
पश्चिम बंगालच्या जलपयगुडी जिल्ह्य़ातून २००५ साली पॉइंटस्मन म्हणून शांती भारतीय रेल्वेत भरती झाली होती. पतीच्या निधनानंतर तिला अनुकंपा तत्त्वावर ही नोकरी मिळाली होती. पण तेवढय़ावर समाधानी न राहता शांतीने आणखी झेप घ्यायचे ठरविले. त्यातूनच गेल्या वर्षी तिने प्रांतिक लष्कराची परीक्षा दिली. लष्करात कोणत्याही महिलेने जवान म्हणून परीक्षा दिलेल्या नाहीत, हे तोवर तिला माहितही नव्हते. भरतीच्या प्रशिक्षणादरम्यान तिच्या नेमबाजीने व बंदूक हाताळण्याच्या कौशल्याने प्रशिक्षकही प्रभावित झाले.
लहानपणीच, लष्करात आपण भरती व्हावे, असे मला वाटे. जवानांचा लष्करी हिरवा गणवेषही मला घालावासा वाटे. माझे काही नातेवाईकही लष्करातच होते आणि त्यांच्यामुळे आपणही लष्करात जावे, असे मला वाटत असे. त्यामुळे शारीरिक क्षमतेसह सर्व परीक्षांत आपण अव्वल ठरले पाहिजे, या एकाच विचाराने मी झपाटले होते. त्यासाठी मी भरपूर सराव आणि मेहनतही केली, असे शांती हिने सांगितले.
भारतीय सेनादलांत महिलांचा प्रवेश प्रथम झाला तो वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातून सेनादलात १९६८ साली दाखल झालेल्या पुनीता अरोरा या लेफ्टनंट जनरल आणि नौदलाच्या व्हाइस अ‍ॅडमिरल या मानाच्या पदापर्यंत पोहोचलेल्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. भारतीय वायुदलातही महिला वैमानिक दाखल झाल्या खऱ्या पण असे असले तरी महिलांचा समावेश हा अधिकारी पदापर्यंतच अधिकांश राहिला. थेट रणांगणावर महिलांची नियुक्ती भारतात आजवर झाली नव्हती.
जगभरात केवळ इस्रायल, कॅनडा आणि न्यूझिलंड या तीन देशांतच महिलांना सेनादलात थेट रणांगणावरही नियुक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे.

Posted by Admin on 9:20 AM. Filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for शांती टिग्गा ठरली लष्करातली पहिली रणरागिणी!

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery