dailyvideo

.

गुन्हेगारी जगताचे भयाण चित्र

आपली काळजी करणारं, विश्‍वासाचं, हक्काचं कुणी आहे ही जाणीवच किती सुखद आहे... पण या जगात अशी कित्येक दुर्दैवी मुले आई-वडिलांच्या, नातेवाईकांच्या प्रेमापासून पोरकी आहेत. त्यांच्या बालमनाला समाजात वावरताना, आपल्या दैनंदिन गरजा भागवताना किती यातना सहन कराव्या लागत असतील, यांची आपण कल्पना करू शकत नाही. त्यातही किशोरवयीन वयातील मुलं जर रिमांड होममध्ये गेलेली असतील तर त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनच खूप वाईट असतो. रिमांड होममध्ये बालपण गेल्यावर तिथे मिळणारी संगत त्यांचे आयुष्यच बदलवून टाकते. कुणी पश्‍चातापासून चांगल्या मार्गाला लागतो तर कुणी गुन्हेगारीच्या दलदलीत फेकला जातो. ‘सारथी एण्टरटेनमेंट’च्या ‘मॅटर’ या मराठी चित्रपटात गुन्हेगारी जगताचे भयाण चित्र रेखाटण्यात आले आहे. पूनम शेंडे निर्मित, सतीश मोतलिंग दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
मराठीत अनेक नावीन्यपूर्ण विषयांवर चित्रपटाची निर्मिती झाली असली तरी गुन्हेगारीसारखा गंभीर विषय म्हणावा तितक्या प्रभावीपणे लोकांसमोर मांडला गेला नाही. निर्मात्या पूनम शेंडे यांनी ‘मॅटर’ चित्रपटातून परिस्थितीमुळे गुन्हेगारीकडे वळलेल्या तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेतला आहे. पक्या, बब्या, राजा आणि रॉनी या चार जिवलग मित्रांच्या आयुष्यावर ‘मॅटर’ची कथा बेतलेली आहे. एका अपघाताने पक्या, बब्या, राजा यांच्यावर खुनाचा आळ येतो आणि बालवयातच त्यांची रवानगी रिमांड होममध्ये होते. तेथे भेटलेल्या पंटर लोकांमुळे ते कशा तर्‍हेने अंडरवर्ल्ड विश्‍वात फेकले जातात, याची थरारक कथा म्हणजे ‘मॅटर’ हा चित्रपट.
संतोष जुवेकर, जितेंद्र जोशी, राजेश शृंगारपूरे, सुशांत शेलार, समीर धर्माधिकारी, उषा नाडकर्णी, सुरेखा कुडची, मेघा धाडे, मिनल घोरपडे, योगिनी चौक, जावेद हैदर, अनिता विश्‍वासराव, दिग्वीजय रोहिदास, अशोक कुलकर्णी, महेश कोकाटे, नारायण जाधव, दीपक वेतकर या कलाकारांच्या भूमिका असलेल्या ‘मॅटर’ चित्रपटात एका विशेष भूमिकेत आ. जितेंद्र आव्हाड रुपेरी पडद्यावर दिसणार आहते. चित्रपटाची कथा - पटकथा आत्माराम धर्णे यांनी लिहिली असून चित्रपटाचे छायांकन दिग्दर्शक सतीश मोतलिंग यांनी केले आहे. संकलन - प्रीतम नाईक, ध्वनी संयोजन संदीप राऊळ यांचे तर कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांनी केले आहे.
‘मॅटर’ या चित्रपटात एकूण ११ गाणी असून ती ओरिजनल आणि रिमिक्स ट्रॅकमध्ये रसिकांना ऐकता येतील. यामध्ये ‘बडा बडा बननेका’, ‘भेनचिक’, ‘मॅटर झाला’, ‘रंगे जवानी माझी’, ‘छप्पन छुरी’ हे ओरिजनल ट्रॅक्स तर याच गाण्यांचे रिमिक्स आणि हिंदी टॅ्रक्सही श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत. यातील ‘बडा बडा बनने का’ हे गाणं जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर आणि सुशांत शेलार यांनी गायलं आहे. याशिवाय  चित्रपटातील अभिनेत्री मेघा धाडे, योगिनी चौक आणि रूमा बोंद्रे यांनीही ‘छप्पन छुरी’ या गाण्यासाठी पार्श्‍वगायन केलं आहे. याशिवाय इतर गाण्यांसाठी अभिजीत कवठाळकर, आदर्श शिंदे, आशिष गाडे, सागर सातपुते, अभिषेक मोतलिंग, रेश्मा सोनवणे अशा यंग ब्रिगेड गायकांचा वापर करण्यात आला आहे. जितेंद्र जोशी आणि दीपक ठुबे यांनी लिहिलेल्या यातील गीतांना अभिजीत कवठाळकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘व्हिडीओ पॅलेस’ कंपनीने प्रकाशित केलेल्या या ध्वनीफितीत चित्रपटातील ११ गीतांसोबत इतर गाजलेल्या २० गीतांचा समावेश आहे. ‘मॅटर’ची ध्वनीफित रु. ४५ इतक्या माफक दरात बाजारात उपलब्ध करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या ध्ननीफितीचं प्रकाशन फ्लॅश मॉबच्या साहाय्याने आगळ्यावेगळ्या पध्दतीने करण्यात आले. चित्रपटातील सर्वच गाणी वेगळ्या बाजाची असून श्रोत्यांना ती नक्कीच आवडतील अशी आहे.
तरुण भारत, सदाफुली. ७ मार्च २०१२ 

Posted by Admin on 9:40 AM. Filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for गुन्हेगारी जगताचे भयाण चित्र

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery