dailyvideo

.

‘पुलं’चा अंतू बर्वा... दिलीप प्रभावळकर!

साहित्याच्या डोहात स्वतः आनंदाने मनसोक्त डुंबणारे आणि रसिकांना डुंबायला लावणारे पु.लं. देशपांडे मराठी मनाला अधिक आवडले ते त्यांच्या व्यक्तिचित्रणांमुळेच. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या व्यक्तिचित्रणपर पुस्तकातील व्यक्तिरेखा या वाचकांना देखील प्रत्यक्ष भेटल्याचा आभास व्हावा इतक्या जिवंत वाटतात. पु.लं.नी आपल्या व्यक्तिचित्रणांवर अफाट प्रेम केले आणि म्हणूनच त्यांना पुस्तकात बंदिस्त करून न ठेवता एकपात्री प्रयोग, कथाकथन यांच्या रुपाने पुस्तकाबाहेर काढले. पुलंच्या प्रेमाखातर ‘गोळाबेरीज’ या चित्रपटातून त्यांच्या गाजलेल्या व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर अवतरत आहेत. मार्मिक अवलोकनाने व सूक्ष्म निरीक्षणाने पुलंनी रेखाटलेली प्रत्येक व्यक्तिरेखा अजरामर झाली. ‘व्यक्ती आणि वल्ली’तील त्यांची अजरामर ठरलेली व्यक्तिरेखा म्हणजे ‘अंतू बर्वा’. ‘डिफरण्ट स्ट्रोक्स कम्युनिकेशन्‌स प्रा.लि.’ च्या ‘गोळाबेरीज’ या मराठी चित्रपटातून दिलीप प्रभावळकर ‘अंतू बर्वा’ ही व्यक्तिरेखा साकारीत आहेत. डॉ. देवदत्त कपाडिया निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन क्षितीज झारापकर यांनी केले आहे.
शांत, संयत अभिनयाने कित्येक भूमिका जगलेले दिलीप प्रभावळकर आजही रंगभूमी, छोटा पडदा आणि हिंदी- मराठी चित्रपट या सर्वांत लिलया वावरताना दिसतात. चिमणरावपासून ते टिपरे आजोबांपर्यंत आणि ‘चौकट राजा’पासून ‘मुन्नाभाई’च्या महात्मा गांधीपर्यंत. त्यांच्या भूमिका जरी विविधरंगी असल्या तरी त्या सगळ्यांत असलेले साम्य म्हणजे त्यातील निरागसता...! दिलीप प्रभावळकरांची हीच खासियत अंतू बर्वाच्या भूमिकेत पडद्यावर पहायला मिळणार आहे. जीवनात सुखाबरोबर दुःखाचे आणि विनोदाबरोबर कारुण्याची झालर देणारी पुलंची ही व्यक्तिचित्र समजून घेताना हसता हसता डोळे कधी ओले होतात ते समजत नाही.
अंतू बर्वा ... रत्नागिरीच्या मधल्या आळीत राहणारी ही वल्ली पुलंना जावईबापू म्हणून आपलेपणाने संवाद साधते. त्यांच्या स्वभावाला पुलंनी रत्नागिरीच्या लाल चिर्‍यांची, नारळ - फणसांचे, खाजर्‍या अळवाचे आणि ओल्या सुपारीचे गुण एकवटलेला व्यक्ती म्हणून विशेषणे बहाल केली आहेत. असे हे अंतू बर्वा ह्याच मातीत उगवले आणि पिकले. वास्तविक अंतू बर्व्याला कोणी एकेरी संबोधावे असे त्यांचे वय नाही, पण समोरासमोर नसले तर सगळे त्यांना अंतू किंवा अंतूशेट या नावानेच संबोधतात. त्यांचे दिसणे, त्यांचे बोलणे, त्यांचे मराठी भाषेला बहाल केलेले अनेक शब्द प्रयोग ऐकताना कोकणातल्या मराठी भाषेची चव चाखायला मिळणार आहे. प्रत्येकाच्या सुखदःखात सहभागी होणारा हा अस्सल कोकणातला माणूस पडद्यावर पाहताना नक्कीच आनंद मिळणार आहे.
तरुण भारत, सदाफुली. ७ मार्च २०१२ 

Posted by Admin on 9:36 AM. Filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for ‘पुलं’चा अंतू बर्वा... दिलीप प्रभावळकर!

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery