dailyvideo

.

दिनेश त्रिवेदी यांचा राजीनामा

    नवी दिल्ली - आपल्याला न विचारता परस्पर रेल्वे भाढेवाढ करणारे तृणमूल कॉंगे्रस नेते व केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना रेल्वेमंत्री पदावरून हटवावे, अशी स्पष्ट मागणी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांकडे केली होती. ममता बॅनर्जींचा संताप लक्षात घेऊन रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आपला राजीनामा पंतप्रधानांकडे सादर केला होता आणि पंतप्रधानांनी रात्री उशिरा तो मंजूरही केला.
    दिनेश त्रिवेदी यांच्या जागी आता मुकुल रॉय यांना रेल्वेमंत्री करण्यात यावे, अशी ‘सूचना’ही ममतांनी पंतप्रधानांना केली आहे. यासंदर्भात ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले होते. या घडामोडींमुळे धाडसी रेल्वे अर्थसंकल्प सादर करणे दिनेश त्रिवेदी यांना चांगलेच महागात पडले आहे.
    त्रिवेदींच्या राजीनाम्याच्या मागणीसंदर्भात ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, ममता बॅनर्जी यांची मागणी मान्य केल्यास संपुआ सरकारची अब्रू धोक्यात येईल, अशी भीती वरिष्ठ मंत्र्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ममतांची समजूत काढण्याचे प्रयत्न कॉंग्रेसकडून सुरू झाले होते. रेल्वे बजेट मांडल्यानंतर काही तासांतच रेल्वेमंत्र्याला राजीनामा द्यावा लागणे, ही कॉंग्रेससाठी नामुष्कीची बाब ठरेल, असे वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, ममता बॅनर्जी आपल्या मागणीवर ठाम असल्याने संपुआ सरकारचा नाईलाज झाला. ममतांच्या मागणीसंदर्भात सरकारचे काही मंत्री व कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची रात्री उशिरा बैठक झाली. यावेळी त्रिवेदींचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. ममता बॅनर्जी यांच्या दबावासमोर किती झुकायचे, त्यांना किती ‘भाव’ द्यायचा याचा विचार करण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया काही वरिष्ठ नेत्यांनी या बैठकीत व्यक्त केल्याचे समजते.
    लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून मुकुल रॉय यांची औपचारिकपणे घोषणा सरकारतर्फे करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणावरून संपुआ सरकारचे अस्तित्व धोक्यात आल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून कॉंग्रेसने समाजवादी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. दरम्यान, संपुआ सरकार कोसळू देणार नाही, अशी ग्वाही सपा नेत्यांनी दिल्याचे कळते. बजेटनंतर अवघ्या काही तासांतच रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना राजीनामा द्यावा लागल्यामुळे संसदेच्या इतिहासातील ही एक अभूतपूर्व घटना ठरली आहे.

Posted by Admin on 4:53 PM. Filed under , . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for दिनेश त्रिवेदी यांचा राजीनामा

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery