dailyvideo

.

मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय

       न्यूयॉर्क, (९ मार्च) - रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा सर्वांत श्रीमंत भारतीय ठरले आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या एकूण संपत्तीत ४.७ अब्ज डॉलर्सने घट झाल्यानंतरही त्यांनी भारतातील ४७ अब्जाधिशांवर मात करीत आपले स्थान अढळ ठेवले आहे. फोर्ब्ज या नियतकालिकेने जगातील श्रीमंतांच्या आपल्या वार्षिक यादीत ही माहिती दिली आहे.
    भारतातील ‘टॉप टेन’ अब्जाधिशांमध्ये सावित्री जिंदल आणि त्यांचे कुटुंब (जागतिक क्रमवारी ८०), सुनील मित्तल आणि कुटुंब (११३), कुमार बिर्ला (११६), अनिल अंबानी (११८), दिलीप शांघवी (१२४), शशी आणि रवि रुईया (१३३) आणि कुशाल पाल सिंग (१५३) यांचा समावेश आहे.
    या यादीत केवळ भारतातील अब्जोपतींची संख्या ४८ आहे. विशेष म्हणजे, जागतिक अब्जोपतींच्या यादीतही नऊ अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. हे अनिवासी भारतीय इंडोनेशिया, आयर्लंड, थायलंड, ब्रिटन आणि अमेरिका यासारख्या देशांमधील आहेत. यामुळे जागतिक अब्जाधिशांच्या यादीत एकूण भारतीयांची संख्या ५७ इतकी आहे, असे फोर्ब्जचा अहवाल सांगतो.
    भारतातील ४८ अब्जाधिशांची एकूण संपत्ती १९४.६ अब्ज डॉलर्स इतकी आहे. या यादीत केवळ दोन भारतीय महिला आहेत. यात १०.९ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या जिंदल समुहाच्या सावित्री जिंदल आणि २.२ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या मीडिया गु्रप बेनेट कोलेमनच्या अध्यक्षा इंदू जैन यांचा समावेश आहे.
    रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण संपत्ती २२.३ अब्ज डॉलर्स इतकी असून, जागतिक श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रमांक १९ वा आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्ती गेल्यावर्षी ४.७ अब्ज डॉलर्सची घट झाली असतानाही त्यांनी भारतातील प्रथम क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून आपला मान कायम राखला आहे.
    त्यांच्या खालोखाल २०.७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मित्तल उद्योग समुहाचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल हे जागतिक यादीत २१ व्या क्रमांकावर आहेत. मित्तल यांच्या संपत्तीत गेल्या वर्षी १०.४ अब्ज डॉलर्सची घट झाली होती. गेल्या वर्षीच्या यादीत ३१.१ अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह मित्तल सातव्या स्थानावर होते. २००४ नंतर प्रथमच मित्तल ‘टॉप टेन’ यादीतून बाहेर पडले आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.
    जागतिक श्रीमंतांच्या यादीत अंबानी आणि मित्तल यांच्यासोबत अझिम प्रेमजी, एन. आर. नारायणमूर्ती, वॉरेन बनेल, बिल गेट्‌स यांचाही समावेश आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीत फोर्ब्जने एकूण १२२६ धनाढ्यांचा समावेश केेलेला आहे. यात मॅक्सिकोच्या दूरसंचार क्षेत्रातील ७२ वर्षीय कार्लोस स्लिम यांनी ६९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिला क्रमांक पटकावला आहे.

Posted by Admin on 9:57 AM. Filed under , , , . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery